सीजेपीच्या पुन्हा आंदोलनाच्या इशार्‍यानंतर सरकार झाले सावध! , जंतर-मंतरवरील सुरक्षा वाढवली, बॅरिकेड्सना वेल्डिंग

Foto
नवी दिल्ली : केंद्र सरकारने धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्यानंतर इतर दोन्ही अटी पूर्ण करण्याचा आश्वासन दिले. त्यानंतर जंतर-मंतरवर जमलेले हजारो आंदोलक घरी गेले. पण, केंद्र सरकारकडून जंतर-मंतर मैदानावरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मैदानाभोवती बॅरिकेड्स उभे करुन त्यांना वेल्डिंगने बसवण्यात आले आहेत. सीजेपीने पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर जंतर-मंतरवरील सुरक्षा कडक करण्याचे काम सुरू झाले आहे.
 
आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे न घेतल्यास पुन्हा आंदोलन सुरू करू, असा इशारा कॉकरोच जनता पार्टीने दिल्यानंतर दिल्लीपोलिसांनी अतिरिक्त जवान तैनात केली आहे. त्याचबरोबर आंदोलनाच्या ठिकाणी असलेले लोखंडी बॅरिकेड्स वेल्डिंग करून जंतर-मंतरवरील सुरक्षा वाढवली आहे.

आंदोलकांवर कोणतीही कायदेशीर कारवाई केली जाणार नाही, असा शब्द केंद्र सरकारने दिला होता, पण तो पाळला नसल्याचा आरोप सीजेपीने केला आणि पुन्हा रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. त्यानंतर काही दिवसांतच जंतर-मंतरवरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. माजी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सीजेपीने ३६ दिवसांचे आंदोलन जंतर-मंदर मैदानावर केले होते, त्याच मैदानाला दोन्ही बाजुंनी बॅरिकेड्स लावून त्यांची वेल्डिंग केली गेली आहे. आंदोलकांना ठरवून दिलेल्या जागेच्या पुढे जाता येऊ नये किंवा भविष्यातील कोणत्याही आंदोलनादरम्यान हे बॅरिकेड्स हटवता येऊ नयेत म्हणून ही पावले उचलण्यात आली आहेत.

पोलीस, निमलष्करी दलाचे जवान तैनात
जंतर-मंतरवर दिल्ली पोलीस, निमलष्करी दल आणि इतर सुरक्षा यंत्रणांचे जवान ठिकठिकाणी तैनात असून, कडक सुरक्षा व्यवस्था अजूनही कायम आहे. मंगळवारी (२८ जुलै) सीजेपीने इशारा दिला होता की, २५ जुलै रोजी आंदोलनानंतर झालेल्या चर्चेनुसार गुन्हे मागे घेण्याचे केंद्र सरकारने मान्य केले होते. केंद्राने त्याचा भंग केला आहे आणि आंदोलकांविरोधातील कारवाई सुरूच ठेवली आहे, त्यामुळे आंदोलन पुन्हा सुरू केले जाईल.

सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी सरकारवर कराराचा पूर्णपणे भंग केल्याचा आरोप केला आहे. कोणतीही कायदेशीर कारवाई केली जाणार नाही, असे आश्वासन दिल्यानंतरही भाजपशासित राज्यांमध्ये शेकडो विद्यार्थ्यांना अटक करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला होता. रांका यांनी सर्व गुन्हे तात्काळ मागे घेण्याची, ताब्यात घेतलेल्या आंदोलकांची सुटका करण्याची, दिल्ली पोलीस, केंद्रीय यंत्रणा आणि भाजपशासित राज्यांमधील पोलिसांकडून नवीन गुन्हे दाखल करणे थांबवण्याची आणि झालेला करार सार्वजनिक करण्याची मागणी केली.

अभिजीत दीपके काय म्हणाला?
सीजेपीचा संस्थापक अभिजित दीपके याने म्हटले आहे की, सरकार आम्हाला आंदोलन सुरू करण्यास भाग पाडत आहे. सरकारने विद्यार्थ्यांना त्रास देणे थांबवले पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये अजूनही राग आहे, कारण त्यांचा राग फक्त एका मंत्र्यावर नव्हता, तर संपूर्ण सरकारवर होता. सरकारने सरळ मार्गावर यावे, नाहीतर विद्यार्थी त्यांना वळणावर आणतील.